Saturday, May 10, 2008
खऱ्या श्रद्धेचे महत्त्व
एखाद्याने अतिशय प्रामाणिकपणे, निस्वाथीर् भावनेने एखादा संकल्प सोडला व आपल्या ध्येयाचा अंत:करणापासून पाठपुरावा केला, त्याचा ध्यास घेतला, तर त्याच्या संकल्पाला ईश्वराचे अधिष्ठान लाभते व निश्चितच त्याची संकल्पपूतीर् होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतात. हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभर 'जगात देव आहे की नाही' यावर अनेक वादविवाद, चर्चा घडत आल्या आहेत. मात्र विज्ञानयुगाची जसजशी प्रगती होत आहे, तसतशी 'देव वा अध्यात्म' ही संकल्पना, स्वामी विवेकानंदांच्याच शब्दांनुसार, अधिकच दृढ होत चालली आहे, यात शंकाच नाही. बौद्ध धर्माचे संस्थापक व महान शांतिदूत गौतम बुद्ध यांना एकदा एका व्यक्तीने विचारले, 'हे स्वामी, या जगात देव आहे का?' गौतम बुद्धांनी उत्तर दिले, 'माहित नाही!' त्यावर त्या माणसाने पुन्हा विचारले, ''जगात देव नाही का?'' त्यावर ते पुन्हा उत्तरले, 'माहित नाही!' एका महान अवतारी पुरुषाच्या मुखातून सहजपणे बाहेर पडलेले हे उद्गार एक प्रगल्भ संदेश देऊन जातात. आधुनिक जगातील एक महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिन्स यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ''देवाचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण आहे, परंतु त्याहीपेक्षा जगात 'देव नाही' हे सिद्ध करणे जास्तच कठीण आहे.'' स्टीफन हॉकिन्ससारख्या विज्ञानाला वाहून घेतलेल्या महान शास्त्रज्ञाचे हे उद्गार निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. ' परमेश्वर' संकल्पनेविषयी आदि शंकराचार्य व त्यानंतर श्री ज्ञानेश्वर- तुकारामांसारखे संत शिरोमणी व 'अद्वैत' सिद्धांत मांडणारे, देवाच्या अस्तित्वाविषयी 'चिद्विलासा'चा 'सत् चित् आनंद' म्हणजेच 'सर्व विश्व हे चैतन्यस्वरूप आहे' असे नि:संदिग्धपणे जगाला ओरडून सांगतात. त्याचबरोबर तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज अत्यंत प्रांजळपणे म्हणतात- आहे ऐसा देव वदवावी वाणि। नाही ऐसा मनी अनुभवावा।। शहाण्या-सुरत्या शिकलेल्या जाणकार मंडळींनी नेहमी संपूर्ण विश्वाचे नियंत्रित करणाऱ्या अदृश्य स्वरूपातील शक्तीरूपी देव आहे, असेच जगाला सांगावे, परंतु चार हातांचा आणि चार तोंडाचा काहीही कर्तृत्व न करता, आयते पलंगावर आणून देणारा देव जगात नाही, याची आपल्या अंत:करणात जाणीव असावी. याच्याही पुढे जाऊन जगद्गुरू म्हणतात- पाषाण देव, पाषाण पायरी। पूजा एकावरी पाय ठेवी।। म्हणजेच गंमत पाहा, की आपण ज्या पाषाणाची देवाची मूतीर् करतो आणि त्या मूतीर्ची पूजा करतो, त्याच पाषाणाची पायरी करून त्याच्यावर पाय ठेवतो. महाराज म्हणतात, 'अरे, भेद जाणून घे, याच्या पाठीमागचा भाव जाणून घे' माणसाच्या मनातील भावनेला किंवा श्रद्धेला विशेष महत्त्व आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आमच्या श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे प्रमुख विश्वस्त, जगप्रसिद्ध पखवाज वादक वै. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर हे मला नेहमी आग्रहपूर्वक समजावून सांगत की, आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्यातरी एखाद्या आदर्श व्यक्तीवर, जसे आपली आई, वडील, गुरू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींवर नि:संशय विश्वास वा श्रद्धा ठेवावी. याच्यामध्ये आपले स्वत:चे वैयक्तिक हित आहे, आपलेच कल्याण आहे. आपली ही 'श्रद्धा' निश्चितपणे डोळस असावी, हे निविर्वाद. बापू त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचे की, ''आजकाल बरीच शिकलेली मंडळी 'जगात देव आहे' याच्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत. खऱ्या श्रद्धेलाही अंधश्रद्धा म्हणून हिणवू लागली आहेत. पण कराड साहेब, एक गोष्ट आपण जरूर ध्यानात ठेवा, की प्रत्येक जीवाने वा मनुष्यप्राण्याने आपल्या जीवनात कुठेतरी, कोणावर तरी आपल्या स्वत:च्या हिताकरिता श्रद्धा ठेवावी. तुम्ही म्हणाल की, 'जगात श्रद्धा ठेवण्याच्या उंचीची वा लायकीची माणसं कुठं आहेत? कुठे आहेत असे आदर्श?' यावर मी असं म्हणेन, की तुम्हाला जगात कुणीही आदर्श दिसत नसेल, सद्गुणी दिसत नसेल वा कुणावरही श्रद्धा ठेवावी असे वाटत नसेल, तर किमान एखाद्या 'दगडा'वर तरी श्रद्धा ठेवा. अट एकच की ती तुमची श्रद्धा खरी असावी, नि:संशय व निर्मळ असावी.'' बापू पुढे म्हणायचे, ''या तुमच्या साध्या दगडावरील खऱ्या श्रद्धेमुळे, त्या दगडामध्ये किंवा पाषाणामध्ये 'देवत्व' निर्माण होईल की नाही हे मला माहित नाही, परंतु तुमच्या अंत:करणामध्ये 'देवत्व' निश्चितच निर्माण होईल, असा माझा पूर्ण विश्वास आहे.'' माझ्या मते, हा खरं म्हणजे एक महान सिद्धांतच आहे. शंकरबापूंचे हे शब्द माझ्या अंत:करणावर कायमस्वरूपी कोरले गेले आहेत. मी या गोष्टीची सदैव अनुभूती घेत आहे. - प्रा. विश्वनाथ कराड
एकात्मतेची गोधडी
वेणुगोपाल धूत वेणुगोपाल धूत हे प्रसिद्ध उद्योजक असून त्यांचा भगवद्गीतेचा गाढा अभ्यास आहे. आधुनिक व्यवस्थापन शास्त्राची भारतीय तत्त्वज्ञानाशी सांगड घालून नव्या उद्योजकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. ...... जीवन कसे जगायचे ते श्रीमद्भगवद्गीता माणसाला शिकविते. गीता नुसतीच पाठ करून जीवन सुधारणार नाही तर त्याच्या शिकवणीप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात आचरणानेच जीवन समृद्ध बनेल. माणूस चित्त एकाग्र करू लागला की, भगवान त्याला सोयी देतो. नचिकेताने यमराजाजवळ आत्मज्ञान मागितले. त्यावेळी यमराज त्याला म्हणतो : माणसाला स्वप्नातही मिळणार नाहीत अशा सुख-सोयी, भोग मी तुला देतो. दुसरे तुला काय पाहिजे?' नचिकेत ते घ्यायला तयार झाला नाही. तो म्हणाला: 'मला आत्मज्ञानाच्या बदल्यात दुसरी कोणतीही वस्तू नको. प्रथम मला आत्मज्ञान द्या, मग जे काही द्याल ते घ्यायला मी तयार आहे. आत्मज्ञानाऐवजी हे सर्व देऊ इच्छित असाल तर ते तुमच्याकडेच ठेवा. मला त्यातले काही नको.' अशा वेळी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचारांची प्रकर्षाने आठवण येते. ते म्हणत असत माणूस दृढनिश्चयी असायलाच हवा. त्याशिवाय त्याला कुठल्याही कामात यश मिळणार नाही. सोबत अहंकाराची साथ हवी, परंतु अहंकार जीवन सुसंस्कारित करण्यासाठी कामाला येणारा आणि प्रभूकार्यासाठी उपयुक्त असा असायला हवा. स्वार्थासाठी उपयोगात आलेला अहंकार हा माणसाला दु:खी बनवितो तर प्रभूकार्यासाठी आणि इतरांचे जीवन फुलविण्यासाठी वापरण्यात आलेला अहंकार हा जीवनाचा परिपोष करणार असतो. मुल्ला नसरुद्दीनच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यांत बरेच काही दडलेले असते. आता ही कथा बघा ना... एकदा मुल्ला नसरुद्दीनच्या बायकोने 'धडाम्' असा आवाज ऐकला. ती धास्तावली. तिने ओरडून मुल्लांना विचारले, ''अजी क्या हुआ?'' मुल्लांनी दुसऱ्या खोलीतून उत्तर दिले, ''कुछ नहीं। बस मेरा अंगरखा गिर गया।'' तिने पुन्हा बावचळून सवाल केला, ''अजी, अंगरखा गिरने पर इतनी ज्यादा आवाज कैसे हुई?'' मुल्लांनी खुलासा केला, ''बेगम, आवाज इसलिए हुई, क्यों की अंगरखे के अंदर मैं भी था।'' ही गोष्ट ऐकणारे किंवा वाचणारे मजेत हसतात. प्रत्यक्षात या गोष्टीत फार मोठा गूढार्थ, आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. अंगरख्याचा या गोष्टीतला दुसरा अर्थ 'अहंकार' असा सुद्धा आहे. अहंकारात गुरफटलेली माणसे भुईसपाट होतात. तेव्हा त्यांच्या भौतिक पडझडीमुळे नुकसान होत असते. जोरदार मार लागत असतो. पण मनावी स्वभाव असा काही विचित्र असतो की पुन: पुन्हा अंगरखा, म्हणजे अहंकाराचा अंगरखा घालायचा मोह काही सुटत नाही. दोन्ही पायांवर एरवी भक्कम उभा राहणारा माणूस अहंकाराचा अंगरखा पायात अडकून डगमगू लागतो. त्याचा तोल सुटू लागतो. तो जोरात खाली आपटतो. अशा घात करणाऱ्या अंगरख्यांऐवजी प्रत्येक धर्मात मायेची ऊब देणाऱ्या, करुणेचा प्रसार करणाऱ्याही कथा आहेत. या कथांमध्ये, अशा अनेक अभंगांमध्ये सहजीवन, सहकार्य व सद्भावनेचा मंत्र वारंवार जपलेला दिसतो. प्रकृती-संस्कृती-विकृती या तीन शब्दांमधील परस्पर संवाद-विसंवाद लक्ष घेतल्यास प्रकृती सत् मार्गाने जाणे म्हणजे संस्कृती. हे घडले नाही, प्रकृती ही अपमार्गाने गेली, असत् मार्गाने गेली तर ती विकृती होते. संस्कृती ही प्रकृतीला संरक्षण देणाऱ्या वस्त्रासारखी असते. ही वस्त्रे झुगारण्याची काहींची वृत्ती असते. याचाच अर्थ असा की वस्त्रे झुगारणेही नको व न पेलणारी अहंकाराची वस्त्रेही घालणे नको. कष्टाने स्वत:च सूत कातून त्यापासून तयार केलेली वस्त्रे घालणारी व्यक्ती कधीही वस्त्रांची लयलूट स्वीकारणार नाही. जीव व शिव, आत्मा व परमात्मा, भौतिक व आध्यात्मिक असे ताणे-बाणे विणतच आयुष्याचा पट विणावा लागतो. तो साधा, निष्कलंक व सुरक्षितता देणारा असायला हवा. किनखाप, जरीगोटा वगैरेचा भपका त्यात नसतो. भपक्यापोटी येणारा अहंकारही त्यानंतरच चार हात दूरच राहतो. माणसाला माणसाशी जोडणारी गोधडी कोणत्याही भरजरी वस्त्रांच्या ढिगापुढे श्ाेष्ठ ठरते. आजी, आई, आजही गोधडी शिवताना दिसते. फरक एवढाच की शहरांत आज अशी गोधडी तयार होताना दिसत नाही. खेड्यांमध्येच ती घडते. जुन्या वस्त्रांचे तुकडे-तुकडे जोडून कोणाला तरी ऊब मिळावी, या भावनेने ती गोधडी शिवणाऱ्या स्त्रियांचे जणू ध्यान लागलेले असते. एका-एका टाक्यात त्यांना परमेश्वरच दिसत असावा. गोधडी पांघरणाऱ्या नातलगांनाही त्यात जोडलेल्या वस्त्रांसोबत ती वापरणाऱ्या आजी-आईचा स्पर्श जाणवत असावा. अहंकाराच्या अंगरख्यापेक्षा एकात्मतेची गोधडी ती पांघरणाऱ्या व्यक्तीला नक्कीच संपन्न करून जाते
भागवत संप्रदायाच्या अध्यात्माचे मर्म
उल्हास पवार उल्हास पवार हे गेली तीन-चार दशके राजकारणात आहेत. शिवाय संतसाहित्य आणि लोककला यांच्या अभ्यासासाठीही ते प्रसिद्ध आहेत. ...... संत शिरोमणी ज्ञानेश्वरांनी 'आता विश्वात्मके देवे। तेणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनी मज द्यावे पसायदान' ही जगाच्या कल्याणाकरिता केलेली प्रार्थना आहे. तोच मुद्दा भागवत संप्रदायाच्या संत मंडळींनी पुढे पुढे अतिशय सुंदर रीतीने मांडला आहे. माऊलींच्या काळामध्ये, निवृत्तीनाथांच्या किंवा सोपानकाका, मुक्ताईच्या काळामध्ये संत नामदेव, संत चोखोबा असे खूप संत या ठिकाणी होऊन गेले. आपल्या सर्वांना ती कथा माहिती आहे की, चोखोबांच्या मंगळवेढ्याला दुष्काळ पडला आणि अपघात झाला. भिंत पडली. खूप माणसे त्या ठिकाणी मारली गेली. त्यामुळे आता चोखोबांच्या अस्थी कशा आणायच्या असा प्रश्न पांडुरंगाला पडला. पांडुरंगाने नामदेवाला सांगितले की, मंगळवेढ्याला जा आणि चोखोबाच्या अस्थी घेऊन ये. संत नामदेवांनी पांडुरंगाला प्रश्न विचारला की, अस्थी कशी ओळखू. पांडुरंगाने सांगितले, 'साधी गोष्ट आहे. अस्थी उचलायच्या आणि कानाला लावायच्या. ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या चोखोबांच्या अस्थी असतील.' केवढा आत्मविश्वास पांडुरंगाला. सर्व अस्थी नामदेवांनी गोळा केल्या आणि पंढरपूरला आणल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्या ठिकाणी नामदेव पायरी आहे तेथे संत नामदेवांच्या घरातील १३ कुटुंबीयांनी संजीवन समाधी घेतली आणि कुटुंबात नसलेली; परंतु कुटुंबातल्या सारखीच असलेली संत जनाबाई ही चौदावी. नामदेवांनी पांडुरंगाजवळ एक याचना केली, तुझ्या पायरीजवळच माझ्या अस्थी असल्या पाहिजेत. जे जे वारकरी वर्षांनुवषेर् येतील, ते माझ्या माथ्यावर पहिल्यांदा पाय ठेवतील आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतील. ही एवढी मोठी भावना संत नामदेवांच्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी संत नामदेवांच्या पायरीच्याबरोबर समोर चोखोबांचा अस्थिकलश आहे. जो वारकरी चंदभागेतून स्नान केल्यानंतर शूचिर्भूत होऊन येता,े तो पहिल्यांदा चोखोबांचे दर्शन घेतो, नंतर नामदेव पायरीजवळ नामदेवांचं दर्शन घेतो. नंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतो. पहा कशी व्यवस्था. या सगळ्या आध्यात्मिक भागवत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानामध्ये प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष दर्शन तुम्हा-आम्हाला पाहायला मिळते. प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी साहित्य संमेलनात बोलताना या सगळ्या दृष्टांतांचे, या सगळ्या कथेचं वर्णन करताना इतके सुंदर सांगितले होते. आम्हा सर्वांकडे, राजकारणातील माणसे जी व्यासपीठावर बसली होती त्यांच्याकडे बघत ते म्हणाले होते, 'चंदभागेतून स्नान केल्यानंतर पहिलं चोखोबांचं दर्शन, नंतर नामदेव आणि तिसरे पांडुरंगाचे दर्शन घेतो; परंतु तुम्हा राजकारणी लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर चंदभागेतून स्नान केल्यावर पहिलं दर्शन बीसीचं, नंतर ओबीसीचं व नंतर पांडुरंगाचं.' या सर्व कृती ७०० वर्षांपूवीर् घडल्या आहेत. जो प्रत्यक्ष कृतीचा धागा आहे, मर्म आहे, जे आम्हाला करणे अत्यंत अवघड वाटते, ते प्रत्यक्ष पांडुरंगाच्या राऊळासमोर पाहायला मिळते. हे भागवत संप्रदायाच्या आध्यात्मिक संस्कृतीचे परमोच्च विचारधन आहे. माझ्या लहानपणी जसे जसे मला कळायला लागले, तेव्हा झालेले हे आकलन. पहिली पायरी, अध्यात्म म्हणजे नेमके काय, शोधतायत काय, उमगलं काय, समजलं काय, जाणलं काय, त्याचा हा प्रारंभिक भाग. सर्व समाजातील प्रत्येक माणूस हा ईश्वराच्या अंशाने भरलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश आहे. किंबहुना माझ्यामध्ये आणि देवामध्ये काही अंतर नाही, 'मी-तू'पणा असा नाही, अद्वैत भाव आहे. देव आणि मी यात दुजाभाव नाही, हे मर्म मला भागवत संप्रदायाच्या अध्यात्मातून अतिशय उत्तम समजले.
निरागस अंत:करण
दुदैर्वानं कितीतरी माणसं दांभिकपणे वर गोड गोड बोलतात आणि आपलं कार्य साधून घेतात. पण काही थोडी माणसं अशीही आहेत की, ज्यांच्या अंत:करणात परमेश्वर वास करत असतो आणि ती निरागसपणे दुसऱ्यांवर आपुलकीनं प्रेम करतात. झोपडपट्टीत राहणाऱ्या एका पंधरा वर्षांच्या मुलाला, तो बरेच दिवस बेकार असल्यामुळे, मी माझ्या संस्थेच्या कॅन्टिनमध्ये कपबश्या धुण्याची नोकरी लावली. त्याला आईवडील नव्हते. तो दृष्टिहीन असलेल्या म्हाताऱ्या आजीजवळ राहत होता. त्या आजीला मी तिला भेटावं अशी त्याची फार इच्छा होती. त्या मुलानं बऱ्याच वेळा आग्रह केल्यानंतर मी त्याच्याबरोबर झोपडपट्टीत त्याच्या घरी गेलो. आजीला फार आनंद झाला. ती म्हणाली, ''मी सडा घालून झोपडी आणि अंगण स्वच्छ केलं आहे. आता तुम्ही माझ्यासाठी रांगोळी घाला.'' मला जशी येत होती तशी मी रांगोळी घातली. आत गेल्यावर ती म्हणाली, ''तुमच्या स्वागतासाठी गुच्छ आणणं मला परवडत नाही. पण मी तुमच्यासाठी चार-पाच उदबत्त्या आणल्या आहेत. त्या देवापुढे लावा.'' तिने मला आग्रहानं चहा दिला. चहाचा कप अतिशय चांगल्या दर्जाचा होता. म्हणून तिला विचारल्यावर ती म्हणाली, ''हा कप मी खास तुमच्यासाठी दुकानातून विकत आणला आहे. '' तिचं आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो. तिच्या अंत:करणात असलेली निरागस भक्ती ही शुद्ध होती. ती म्हणाली ''मला काही मागायचं नाही. तुम्ही माझ्या नातवाला अन्नाला लावलं. म्हणून मी तुमच्या पायाला स्पर्श करण्यासाठी तुम्हाला बोलावलं.'' अगदी गरीब लोकसुद्धा 'देव भावाचा भुकेला म्हणतात' त्याप्रमाणे मला परमेश्वर मानून तिनं माझ्याबद्दल भक्तिभाव व्यक्त केला होता. पुढे अनेक वर्षांनी तो मुलगा मोठा झाला आणि त्याला चांगली नोकरीही मिळाली. आता तो आजी गेल्यावर ती झोपडी सोडून एका सदनिकेत पत्नीसह राहत होता. मला तो पुन्हा भेटायला आला आणि म्हणाला, ''माझी आजी सारखी तुम्हाला परमेश्वरच मानत होती. तिनं तिचा फोटो तुम्हाला द्यावा असं सांगितलं होतं. आजी स्वर्गवासी होण्यापूवीर् आणि झोपडी सोडण्यापूवीर् मी तिचा फोटो काढला होता. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा तुमच्याकडे आणला आहे.'' माझे डोळे भरून आले. माणसातच परमेश्वर असतो हे अध्यात्म जे त्या म्हाताऱ्या आजीला समजलं होतं ते कित्येकांना समजत नाही. तिच्या निरागस भक्तिभावाने मी बरंच काही शिकलो. दीन-दुबळ्या विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करावी. त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं आणि त्यांना सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा द्यावी हे मी आयुष्यभर पुढे करत आलेलो आहे. पैसा आणि समृद्धी मिळाली की लोक पूजा वगैरे करण्याचं कर्मकांड करतात. पण आपल्यापेक्षा प्रतिष्ठेने लहान असलेल्या लोकांशी तुसडेपणाने वागतात. अध्यात्म म्हणजे केवळ पोथी वाचन नव्हे. माणुसकीतच अध्यात्म साठलेलं आहे. माणसं जोडणं हा मी माझा धर्म मानला आहे. एखाद्याला मी मदत करू शकलो नाही तर मला फार वाईट वाटतं. त्याचबरोबर एखाद्याला अडचणींतून सोडवलं किंवा त्याला योग्य तो मार्ग दाखवला की मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. अध्यात्मात उर्मटपणे बोलणं अजिबात बसत नाही. कित्येक वेळा मला टेलिफोनवर राँग नंबर येतात. पण मी कधीही चिडत नाही. उलट त्याची किंवा तिची चौकशी करून अतिशय शांत आवाजात बोलतो. एकदा एका बाईचा मला राँग नंबर आला. मी तिच्याशी नीट बोललो. तिची चौकशी केली. तिला कोणता नंबर हवा आहे ते तिला नीट सांगितलं आणि फोन ठेवणार इतक्यात ती बाई मला म्हणाली, ''अहो, फोन इतक्यात बंद करू नका, मी ऐंशी वर्षांची आहे आणि घरात एकटीच राहते. तशी मी सुखवस्तू आहे. पण बोलायला माणसं नाहीत. तुम्ही अजून फोनवर माझ्याशी बोला.'' मग मी तिच्याशी बोललो आणि तिच्या इच्छेखातर आठवड्यातून एकदा तरी तिच्याशी फोनवर बोलतो आणि त्यामुळे तिला होणाऱ्या आनंदात मी माझं अध्यात्म पाहतो. माणसं जोडणं म्हणजेच परमेश्वराची सेवा करणं हे मी मानतो. माणसं जोडण्यासाठी काही वेगळे श्ाम करावे लागत नाहीत किंवा पैसाही खर्च करावा लागत नाही. साधं स्मितहास्य केलं तरी इतरांना बरं वाटतं. पण तेही आम्ही लोक करीत नाही. रिक्षावाले उर्मट असतात ही गोष्ट खरी. पण मी रिक्षात बसण्यापूवीर् त्याला म्हणतो ''काका, माझे गुडघे दुखत असल्यामुळे रिक्षात बसायला मला जरा वेळ लागेल.'' तो प्रेमाने मला रिक्षात बसायला मदत करतो. शिवाय घरी आल्यावर रिक्षातून उतरण्यासाठी आणि घराचा जिना मला चढता यावा म्हणून हात धरून माझ्या घरात सोडतो. माणसं मुळात उद्धट किंवा रागीट नसतात. आपण त्यांच्या अंत:करणातल्या परमेश्वराला हाक मारली की तो जागा होतो आणि मग असा माणूस, स्वभावाने एरव्ही कसाही असला तरी अतिशय प्रेमळपणे वागतो. ज्याच्या स्वभावात अध्यात्म आहे अशा कोणालाही कधीही त्रास होत नाही. त्याला सभोवतालचं जग आणि सृष्टी सुंदर वाटते. त्याला सभोवतालची माणसं परमेश्वरस्वरूप वाटतात. - डॉ. प्र. चिं. शेजवलकर
निसर्गयात्रा
- रवींद पिंगे पू. गोंदवलेकर महाराजांचं एक मामिर्क निरीक्षण आहे. ते म्हणतात, 'पैशांमुळे सुखी झाला असा माणूस माझ्या पाहण्यात नाही.' पैसा केंदस्थानी आणि जगाचे सगळे व्यवहार त्याच्या भोवती फेर घालताहेत, असंच चित्र सरसकट आहे. का? कारण धनराशीला सत्ता चिकटलेली आहे आणि मुठीत सत्ता असणं हाच परमपुरुषार्थ आहे, असं हा इहलोक मानतो. या दृढ समजाला टक्कर देण्यासाठी विनोबाजींनी जाहीर केलं की धनाची प्रतिष्ठा मोडून काढण्यासाठी माझी ही तनू मी झिजवेन. त्यांच्यापुरतं त्यांना संपूर्ण यश आलं. पण इतरांचं काय? त्यांच्या लेखी पैसा तर सर्वशक्तिमान. यशस्वी लेखक असलेल्या सॉमरसेट मॉमने आपलं आयुष्यभराच्या अनुभवाचं सार लिहून ठेवलं आहे. मॉम सांगतो : 'पैसा हे सहावं इंदिय आहे. ते नसेल तर उरलेली पांच इंदियं निरुपयोगीच.' हे खरंच आहे. पैसा सुविधा पुरवतो. पण पैसा आहे म्हणून मॉम सुखी झाला असं चित्र नाही. गुणी लेखणीच्या बळावर त्याने धनाचे रांजण भरले. उदंड कीतीर् मिळवली. तथापि त्याची दुसरी काळोखी बाजू चित्त उदास करणारी आहे. तो अतिविकृत झाला. बायकापोरं सोडून गेली. परावलंबी वार्धक्य सहन करीत तो भयग्रस्त आणि भ्रमिष्ट झाला. या उलट कनवटीला धनराशी नसतासुद्धा अमेरिकेचा थोरो किंवा आपल्याकडचे दि. बा. मोकाशी नि ज्ञानमाता दुर्गा भागवत प्रसन्नतेचं चांदणं शिंपीत स्वत:च्या अटींवर जगले. तात्पर्य : पैसा हवाच; फक्त त्याचं अवास्तव स्तोम नको. पण समाधानाच्या दिशेचं काय? सांगतो : निसर्गाशी असलेलं आपलं सनातन नातं ओळखणं, निसर्गात निवांत फेरफटका करणं, आणि वसुंधरेवर जिंदादिल मोहब्बत करणं, याच पायवाटा जागृत माणसाला विमल समाधानाच्या सरोवराकडे नेतात. अग्नी, पाणी आणि वृक्षवल्लरीत विश्वंभराचं रूप पाहत जगा, अशी उपनिषदांची शिकवण आहेच. अमेरिकेची अभिनेत्री ग्रेटा गाबोर् हिचं एक मामिर्क विधान आहे. ती सांगते, 'मला एकाकीपण बिलकूल नको. मला हवंय निवांतपण. मी माणसांमध्येच राहणार. पण मला जरा गदीर्पासून मोकळीक द्या नं.' गदीर्गोंधळापासून मुक्ती मिळविण्याचा राजमार्ग म्हणजे खांद्याला झोळी अडकवून घराचा उंबरठा ओलांडणे. एकदा दैनंदिन संसाराचा मांडव मागे टाकलात की ऋतुचक्राशी तुमचं हस्तांदोलन होतं. माझ्यापुरतं नियतीचं अलोट औदार्य असं की, भटकंतीचं अमाप सुख मी याच जन्मी काठोकाठ भोगून घेतलं. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं पाहिली आणि लंडनच्या थेम्स नदीत नौकाविहार केला. चंदग्रहणाच्या काळ्याकभिन्न रात्री उफाळलेल्या हिंदी महासागरात उडी ठोकली आणि कच्छच्या उजाड रणातलं पेटतं ऊन अंगावर घेतलं. सध्या दर्याने गिळून टाकलेल्या धनुष्यकोडीच्या वाळवंटावरून श्रीलंकेला जोडणाऱ्या रामसेतूचं किंचित दर्शन घेतलं आणि युरोपचं प्रवेशद्वार असलेल्या इस्तंबूल नगरीचा अद्ययावत पसाराही पाहिला. खेरीज गंगेपासून तुंगभदेपर्यंत नि त्रिवंेदमपासून अंदमानाच्या समुदापर्यंत सर्व छटांच्या जलाशयांमध्ये माझी यथेच्छ दंगामस्ती करून झालेली आहे. स्नान करताना रोज पांचपंचवीस पवित्र नद्यांचं स्मरण करावं, असं शास्त्र सांगतं. मी तर गेला बाजार दोनेकशे नद्याचं पाणी प्यालेलो आहे! एकदा तर पू. सोनोपंतमामा दांडेकरांनी मला माता गोदावरीच्या पैठणच्या पात्रात हाताला धरून नेलं नि अस्ताला जाणाऱ्या सूर्याला प्रणाम करायला लावला! मावळत्या दिनकराच्या सोनशेंदरी पिंगट प्रकाशात त्या आधुनिक ऋषीच्या चेहऱ्यावर तपयुक्त श्रद्धेचं किती सुंदर तेज झळकताना दिसलं! वाहवा! त्याहूनही समाधानाने उजळून निघालेल्या माझ्या म्हाताऱ्या वडिलांचा चेहरा पाहण्याचं भाग्य मला कोकणातल्या भटकंतीने दिलं. बाबा उपळ्याला एकटेच होते. मी त्यांना भेटायला गेलो. मणचे बंदरात बाजारहाट संपवून आम्ही तरीने घराकडे परतत होतो. दिवेलागणीची शांत वेळ होती. मी बाबांना म्हटलं, ''बाबा, मी अधीर् पृथ्वी पाहिलीय. आपल्या उपळ्यासारखं सुंदर ठिकाण या त्रिभुवनात नाही. मी परत परत आपल्या या गावाला येत जाईन''. ' मनापासून सांगतोस रवी?' बाबांनी विचारलं. ' खरंच सांगतो बाबा, या आपल्या सुंदर गावात मी परत परत येत राहीन. घरात दिवाबत्ती करेन. आपली बाग जपेन. देवधर्म पाळेन, सर्वांना सांभाळेन आणि तुमच्या नातवंडा-पंतवंडांना यथेच्छ मासे खायला देईन! तुम्ही निश्चिंत असा.' बाबा मनापासून हसले नि संतोषाने म्हणाले, 'तसं घडलं नं, तर मला स्वर्गच लाभेल! मंगेशाची केवढी कृपा आहे आपल्यावर!' जीवनप्रवासात अदृष्टाची कृपा लाभावीच लागते. त्यालाच 'अनुग्रह' म्हणतात. त्या अनुग्रहाचं वाटप मात्र निराकार नियतीच्या स्वाधीन आहे
परमेश्वरी कृपा
नेमकी केव्हा ही गोष्ट वाचली हे आठवत नाही. परंतु मला वाटतं लहानपणी ती शाळेतल्या पाठ्यपुस्तकामध्ये बहुधा असावी, गोष्ट अशी आहे... एका माणसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका उंच डोंगरावर उभे राहून नदीमध्ये उडी मारण्यासाठी जात होता. तेथे एक साधू ध्यान करत होता. त्याने त्याला अडवले आणि विचारले की एवढे काय झाले? तू एवढा मरायला का तयार झाला आहेस? तो माणूस म्हणाला, ''माझ्याजवळ काही सुद्धा नाही. मी खूप प्रयत्न केले, हताश झालो आहे. परमेश्वर नाराज आहे. काही चांगले घडतच नाही. ज्या दिशेला जातो त्या दिशेला अपयश येते. एक मर्यादा असते. या आयुष्याचा मला आता उबग आला आहे. माझ्याजवळ काहीच नाही. मला मरायचे आहे.'' तो साधू म्हणाला, ''मरणाच्या पूवीर् एक काम तर करून जा. तू तर मरणार आहेसच, माझा थोडासा फायदा करून जा. असे कर, या गावामध्ये जो सावकार आहे, तो माझा मित्र आहे. तो एकदम लहरी आणि विक्षिप्त माणूस आहे. विचित्र गोष्टींचा संग्रह करण्याचा त्याला छंद आहे. मी तुझे डोळे त्याला विकून टाकतो. कमीत कमी एक लाख रुपये तरी मिळतील. तू नाही तरी मरणारच आहेस आणि समजा त्याची लहर फिरली तर तो तुझे कानसुद्धा खरेदी करेल. तोे इतका सणकी माणूस आहे की तो तुझे दात सुद्धा विकत घेईल. तू फक्त माझ्याबरोबर चल.'' आता तो माणूस त्या साधूला काहीच म्हणू शकत नव्हता. तो सांगून चुकला होता की माझ्याजवळ काही नाही आणि मी मरायला चाललेला आहे. परंतु हे त्याच्या लक्षात आले की डोळ्याचे एक लाख रुपये मिळू शकतात आणि मी गरीब नाही. सावकाराच्या घराजवळ येईपर्यंत त्याने ठरवून टाकले की डोळे वगैरे विकणे काही खरे नाही. मरणाचे तर तो विसरूनच गेला. साधू आतमध्ये गेला. सावकाराला तयार केले. त्या माणसाला बोलावले. सावकार त्याला म्हणाला, ''ठीक आहे, तुझे डोळे मी काढून घेतो आणि तू एक लाख रुपये घेऊन टाक.'' तो माणूस म्हणाला, ''तू मला काय समजतोस? माझे डोळे मी विकू?'' सावकार त्याला म्हणाला, ''पैसे जास्त हवे असतील तर तसे सांग. दोन लाख तर दोन लाख देतो. दहा लाख रुपये हवेत, दहा लाख देतो. कान-दात खरेदी करतो. तुझे हात-पायसुद्धा खरेदी करतो. नाही तरी तुला मरायचेच आहे ना!'' तो माणूस म्हणाला, ''पण मला विकायचे नाही ना! कोणता माणूस शुद्धीत आपले डोळे विकेल?'' तो साधू म्हणाला, ''अरे बाबा, तूच तर म्हणाला ना की तुझ्याजवळ काही नाही म्हणून! तू तर मरायला निघाला होतास. मरताना तुझे डोळेही गेले असते, कानही गेले असते, सारे काही गेले असते आणि तू म्हणत होतास तुझ्याजवळ काही नाही म्हणून! आता तर तुला डोळ्यांचे दहा लाख रुपये मिळत आहेत, इतरही अवयव विकून टाकू. करोडो रुपये मिळतील.'' तो माणूस उभा राहिला आणि म्हणाला, ''तुम्ही लोक खुनी आहात. हे काय बोलणे झाले!'' तेव्हा तो साधू म्हणाला, ''आता सांग मरणाबाबत तुझा काय विचार आहे?'' तो म्हणाला की, ''नाही मला आता मरायचे नाही. प्रथमच मला समजले की माझ्याजवळ डोळे आहेत, जे मी दहा लाख रुपयालाही विकू शकत नाही. परंतु मी या डोळ्यांबाबत परमेश्वराचे कधीही आभार मानले नाहीत. मी सारखाच रडत राहिलो की माझ्याजवळ हे नाही, ते नाही, सारखी तक्रारच करत राहिलो. माझे आयुष्य म्हणजे तक्रारींची एक मोठी गाथा आहे. तुम्ही मला बरोबर धडा दिला.'' त्या दिवसापासून त्या माणसाचे आयुष्यच बदलले. तक्रारी संपल्या. त्या दिवसापासून तो मंदिरात जाऊन परमेश्वराचे आभार मानायला लागला. ''परमेश्वरा, तुझी किती कृपा आहे तू मला इतके दिले आहेस की माझी एवढी लायकीसुद्धा नाही. का तू मला एवढे दिलेस हे सुद्धा मला समजत नाही. तू आपल्या प्रेमापोटी दिले असणार. आनंदाने दिले असणार. मी आभारी आहे तुझा! मला अजून काहीही नको आहे.' आणि त्या दिवसापासून तो दु:खी माणूस सुखी होऊन गेला. मला असं वाटतं की, बरेच वेळा आपण आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये सुखी राहण्यापेक्षा जे काही नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत असतो. संपत्तीच्या येण्याने आणि कमावण्याने माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. तो सतत अधिकात अधिकच्या मागे लागलेला असतो. ही त्याची लालसा जीवनभर पूर्ण होत नाही; कारण अर्धा पेला रिकामा आहे. त्याउपर अर्धा पेला भरलेला आहे हे तो समजूनच घेत नाही. अशावेळी श्रीमद्भगवद्गीता कामाला येते. त्यात भगवान सांगतात, 'जो सदैव आत्मसंतुष्ट राहील आणि बुद्धी स्थिर करून भक्ती करील, असा भक्त मला नेहमी प्रिय आहे.' म्हणून सदासर्वकाळ गीतेच्या विचारांचे मनन करून आपले जीवन सुधारले पाहिजे. - वेणूगोपाल धूत
क्षमाशीलतेचे
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परें पडो मैत्र जीवाचे' ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओव्यांनी गीताटीकेचा कळस गाठला आहे. त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा संन्याशाची मुले असल्यामुळे भयंकर छळ झाला. या छळाची मनाला झालेली जखम कधीच भरून निघाली नाही. एवढेच नव्हे तर हा कायमचा उद्वेग हे त्यांच्या समाधीचे एक कारण असावे, असेही महाराष्ट्रातील अभ्यासकांचे मत आहे. असे असूनही 'ज्ञानेश्वरी' पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परमेश्वराकडे दान मागताना सर्व माणसांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमभाव, मैत्री असावी अशी प्रार्थना केली. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी पसायदान वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वरांच्या निकोप, निरामय सात्विक वृत्तीमुळे मला भरून येते आणि खरोखरीच हे दान परमेश्वराने सर्वांना द्यावे अशा मनीच्या प्रबळ जाणिवेने माझे दोन हात जोडले जातात. 'मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त' असे तुकारामांचे एक सुभाषितवजा वचन आहे. ते पसायदानाच्या भावार्थाशी जुळणारे आहे. इंग्लंड, आफ्रिका व भारतातील ख्रिस्ती मिशनऱ्यांशी महात्मा गांधींचा जवळून संबंध आल्याने त्यांची बायबलशी ओळख झाली. बायबलातील येशूच्या वचनांनी गांधीजी प्रभावित झाले. जे सौम्य, मृदू, मवाळ ते धन्य. ईश्वराचा आशीर्वाद, कृपा त्यांना लाभेल असे येशू म्हणत असे. विशेषत: क्रूसावरील येशूचे रूप पाहताना गांधीजी ध्यानस्थ व्हायचे. एवढा भयंकर, अनन्वित छळ होऊनही येशूने शत्रूंना क्षमा करीत म्हटले, ''हे पित्या, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.'' जाणता झाल्यापासून मी दररोज येशूने शिकविलेली प्रार्थना म्हणत असतो. त्या प्रार्थनेत 'जशी आम्ही आमच्या अपराध्याना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर' अशी एक अस्वस्थ करणारी ओवी आहे. त्याचप्रमाणे मी जर अपराध्यास क्षमा करणार नसेन तर या रोजच्या प्रार्थनेला काही अर्थ नाही हे मी मानून आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात हीच क्षमेची भावना आहे. आपण पापाचा तिरस्कार करावा, पाप्याच्या नाही. पाप्यावर प्रेम करावे. आपल्या आंतरिक गाभाऱ्यात कोण नेमका किती दोषी आहे हे तुम्ही ठरवू नका. ते सर्वज्ञानी व सर्व गुह्यज्ञानी परमेश्वरासच ठाऊक आहे, अशा अर्थाचे बायबलात एक मामिर्क सूत्र आहे. त्याचा माझ्यावर गहिरा परिणाम झाला आहे. त्यामुळे येशूचे क्रूसावरील क्षमेचे उद्गार किंवा ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील भावना कृतीत आणणे मला कधी अशक्यप्राय वाटले नाही. कुणी माझ्यावर अन्याय केल्यास, टीका केल्यास, अपराध केल्यास काही वेळेपुरता राग, संताप होतो. पण त्या व्यक्तींबद्दल कधी द्वेष किंवा सूडाची भावना बाळगत नसतो. एक तर डोके आणि हृदय आकाराने लहान आहे! त्यामध्ये आणखी किती जखमा तू जिवंत ठेवणार आहेस? किती कटू आठवणी जपणार आहेस? असे स्वत:लाच प्रश्ान् विचारून मी मन रिते करतो व कार्यमग्न होतो. एका स्नेह्याने माझ्याविरुद्ध एका धादान्त खोट्या व अन्याय्य मजकुरावर अनेकांबरोबर सही केली. मला त्याचे भारी दु:ख झाले होते. पण मी ते गिळून टाकले. पुढे तब्बल पाच वर्षांनंतर हा त्याच्या एक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी माझ्या कार्यालयात आला. मला पाहताच तो उद्गारला, 'मी तुमची माफी मागतो.' मी म्हटले, 'झालेल्या गोष्टीची काही आठवण करू नकोस.' त्याच्या इच्छेनुसार मी त्याच्या कार्यक्रमास जाण्याचे त्वरित मान्य केले. त्याने तेथे माझा मोठा मानसन्मान केला हे सांगणे न लागे. व्यक्तीमध्ये व समाजात सूड, बदला, ठकास ठक, ठोशास ठोसा ही वृत्ती भिनलेली दिसते. काही धर्मांनीदेखील डोळ्याचा बदला डोळा, दाताचा बदला दात व देहांताची शिक्षा यांचे समर्थन केले आहे. 'कुणाच्या कानाखाली आवाज काढणे, थोबाड फोडणे' अशा प्रकारचे उद्गार सर्रासपणे वाचायला, ऐकायला मिळतात. त्यात प्रतिष्ठितही असतात. माझ्या मनाच्या तारा किंवा हृदयाचे स्पंदन अशा वृत्तीशी कधीच जुळलेले नाही. सद्य परिस्थितीत ही बदल्याची, सूडाची भावना एव्हढी विकोपास गेली आहे की, सगळीकडे दहशतवादाने, हिंसाचाराने विक्राळ रूप धारण केले आहे. जे तरवार उगारतील ते तरवारीनेच खाली पाडले जातील असे येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. हिंसेने प्रश्ान् सुटत नसतात. सर्व मनुष्य जीवांबद्दल प्रेम व करुणा असेल तर सूड, बदला, शिक्षा हे अंतिम होऊ शकत नाहीत. गुन्हे, अपराध, अन्याय, जाच जुलूम निपटूनच काढावयास हवेत. पण त्यासाठी त्यास जबाबदार असणाऱ्यांना नष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्या दृष्टीने पाहता दुष्ट नष्ट होण्याऐवजी दुष्टांचे दुष्टपण नष्ट होवो ही ज्ञानेश्वरी प्रार्थना अस्सल उच्च प्रतीच्या अध्यात्माचे लक्षण आहे हे निश्चित. - बिशप थॉमस डाबरे
Subscribe to:
Posts (Atom)
