Saturday, May 10, 2008
क्षमाशीलतेचे
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परें पडो मैत्र जीवाचे' ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओव्यांनी गीताटीकेचा कळस गाठला आहे. त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा संन्याशाची मुले असल्यामुळे भयंकर छळ झाला. या छळाची मनाला झालेली जखम कधीच भरून निघाली नाही. एवढेच नव्हे तर हा कायमचा उद्वेग हे त्यांच्या समाधीचे एक कारण असावे, असेही महाराष्ट्रातील अभ्यासकांचे मत आहे. असे असूनही 'ज्ञानेश्वरी' पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परमेश्वराकडे दान मागताना सर्व माणसांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमभाव, मैत्री असावी अशी प्रार्थना केली. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी पसायदान वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वरांच्या निकोप, निरामय सात्विक वृत्तीमुळे मला भरून येते आणि खरोखरीच हे दान परमेश्वराने सर्वांना द्यावे अशा मनीच्या प्रबळ जाणिवेने माझे दोन हात जोडले जातात. 'मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त' असे तुकारामांचे एक सुभाषितवजा वचन आहे. ते पसायदानाच्या भावार्थाशी जुळणारे आहे. इंग्लंड, आफ्रिका व भारतातील ख्रिस्ती मिशनऱ्यांशी महात्मा गांधींचा जवळून संबंध आल्याने त्यांची बायबलशी ओळख झाली. बायबलातील येशूच्या वचनांनी गांधीजी प्रभावित झाले. जे सौम्य, मृदू, मवाळ ते धन्य. ईश्वराचा आशीर्वाद, कृपा त्यांना लाभेल असे येशू म्हणत असे. विशेषत: क्रूसावरील येशूचे रूप पाहताना गांधीजी ध्यानस्थ व्हायचे. एवढा भयंकर, अनन्वित छळ होऊनही येशूने शत्रूंना क्षमा करीत म्हटले, ''हे पित्या, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.'' जाणता झाल्यापासून मी दररोज येशूने शिकविलेली प्रार्थना म्हणत असतो. त्या प्रार्थनेत 'जशी आम्ही आमच्या अपराध्याना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर' अशी एक अस्वस्थ करणारी ओवी आहे. त्याचप्रमाणे मी जर अपराध्यास क्षमा करणार नसेन तर या रोजच्या प्रार्थनेला काही अर्थ नाही हे मी मानून आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात हीच क्षमेची भावना आहे. आपण पापाचा तिरस्कार करावा, पाप्याच्या नाही. पाप्यावर प्रेम करावे. आपल्या आंतरिक गाभाऱ्यात कोण नेमका किती दोषी आहे हे तुम्ही ठरवू नका. ते सर्वज्ञानी व सर्व गुह्यज्ञानी परमेश्वरासच ठाऊक आहे, अशा अर्थाचे बायबलात एक मामिर्क सूत्र आहे. त्याचा माझ्यावर गहिरा परिणाम झाला आहे. त्यामुळे येशूचे क्रूसावरील क्षमेचे उद्गार किंवा ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील भावना कृतीत आणणे मला कधी अशक्यप्राय वाटले नाही. कुणी माझ्यावर अन्याय केल्यास, टीका केल्यास, अपराध केल्यास काही वेळेपुरता राग, संताप होतो. पण त्या व्यक्तींबद्दल कधी द्वेष किंवा सूडाची भावना बाळगत नसतो. एक तर डोके आणि हृदय आकाराने लहान आहे! त्यामध्ये आणखी किती जखमा तू जिवंत ठेवणार आहेस? किती कटू आठवणी जपणार आहेस? असे स्वत:लाच प्रश्ान् विचारून मी मन रिते करतो व कार्यमग्न होतो. एका स्नेह्याने माझ्याविरुद्ध एका धादान्त खोट्या व अन्याय्य मजकुरावर अनेकांबरोबर सही केली. मला त्याचे भारी दु:ख झाले होते. पण मी ते गिळून टाकले. पुढे तब्बल पाच वर्षांनंतर हा त्याच्या एक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी माझ्या कार्यालयात आला. मला पाहताच तो उद्गारला, 'मी तुमची माफी मागतो.' मी म्हटले, 'झालेल्या गोष्टीची काही आठवण करू नकोस.' त्याच्या इच्छेनुसार मी त्याच्या कार्यक्रमास जाण्याचे त्वरित मान्य केले. त्याने तेथे माझा मोठा मानसन्मान केला हे सांगणे न लागे. व्यक्तीमध्ये व समाजात सूड, बदला, ठकास ठक, ठोशास ठोसा ही वृत्ती भिनलेली दिसते. काही धर्मांनीदेखील डोळ्याचा बदला डोळा, दाताचा बदला दात व देहांताची शिक्षा यांचे समर्थन केले आहे. 'कुणाच्या कानाखाली आवाज काढणे, थोबाड फोडणे' अशा प्रकारचे उद्गार सर्रासपणे वाचायला, ऐकायला मिळतात. त्यात प्रतिष्ठितही असतात. माझ्या मनाच्या तारा किंवा हृदयाचे स्पंदन अशा वृत्तीशी कधीच जुळलेले नाही. सद्य परिस्थितीत ही बदल्याची, सूडाची भावना एव्हढी विकोपास गेली आहे की, सगळीकडे दहशतवादाने, हिंसाचाराने विक्राळ रूप धारण केले आहे. जे तरवार उगारतील ते तरवारीनेच खाली पाडले जातील असे येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. हिंसेने प्रश्ान् सुटत नसतात. सर्व मनुष्य जीवांबद्दल प्रेम व करुणा असेल तर सूड, बदला, शिक्षा हे अंतिम होऊ शकत नाहीत. गुन्हे, अपराध, अन्याय, जाच जुलूम निपटूनच काढावयास हवेत. पण त्यासाठी त्यास जबाबदार असणाऱ्यांना नष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्या दृष्टीने पाहता दुष्ट नष्ट होण्याऐवजी दुष्टांचे दुष्टपण नष्ट होवो ही ज्ञानेश्वरी प्रार्थना अस्सल उच्च प्रतीच्या अध्यात्माचे लक्षण आहे हे निश्चित. - बिशप थॉमस डाबरे
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment