विचारांनी मोठी असलेली अनेक माणसं असतात पण आचरणानेही मोठी असलेली माणसे तुलनेने कमीच. आपला विचार सर्वप्रथम आपल्याच अंगी बाणवून तो आयुष्यभर आचरत राहण्याइतकं अवघड जगात दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे उदाहरण मला याबाबतीत आदर्श वाटते.
शांत, प्रेमळ स्वभावाच्या ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना तत्कालीन समाजाने कितीतरी छळले... त्यांच्या आई-वडिलांना मानसिक त्रास दिला. त्यांच्या कुटुंबाला निंदेचे आणि टीकेचे लक्ष्य बनवले. अशा समाजाला ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिले? तर प्रेमाची आणि मायेची मुग्ध उधळण आणि भागवत धर्माची सहिष्णू शिकवण. सर्वांचे अपराध पोटात घालून सर्वांवर आईची माया करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना 'ज्ञानेश्वर माऊली' असे म्हटले जाते. वाईट गोष्टी लक्षात न ठेवता केवळ चांगल्या गोष्टी मनात ठेवून वागले की आयुष्याला, विचारांना नेमकी दिशा मिळते आणि हातून उत्तमोत्तम काम होत राहते.
बाबरी मशिदीनंतर घडलेले भयानक मृत्यूचे तांडव किंवा गोध्रानंतरचे हत्याकांड पाहिले की मन सुन्न होते. लोक केवळ सूडभावनेनेच का पेटतात? लोक क्षमाशील का होत नाहीत? आणि अशा जखमांच्या खपल्या दरवषीर् या घटनांचा स्मृतिदिन म्हणून का नव्याने काढल्या जातात? हेच समजत नाही. दु:खद, क्लेशदायक प्रसंगांनी मन भरून ठेवण्यापेक्षा ते आनंदाच्या आठवणींनी समृद्ध करावे.
रानातल्या झऱ्याचे उदाहरण याबाबतीत मला आदर्श वाटते. रानातला झरा म्हणजे मुक्ततेचे प्रतिक. अडथळ्यांची पर्वा न करता तो प्रवाही राहतो. वाटेत काटेरी झाडे-झुडपे, छोटे-मोठे खाचखळगे यातून तो आनंदाने झुळुझुळु वाहत राहतो. वाटेत भलामोठा धोंडा आला तर त्यामुळे अडून न जाता, त्याच्या बाजूने वाट काढत आपला प्रवास आनंदाने सुरू ठेवतो. धोंड्याशी जर झरा थांबू लागला तर तो आपले अस्तित्वच गमावून बसेल आणि पाण्याचे निव्वळ डबके त्या धोंड्यापाशी तयार होईल. माणसानेही दु:खद आठवणींपाशी थांबून डबक्यासारखे न होता, आनंद मनात साठवून प्रवाही व्हावे.
अरे, आयुष्याच्या वहीतले कालचे पान तर उलटून गेले आहे, उद्याचे पान असेल की नाही ते माहिती नाही. आहे ते फक्त आजचे कोरे पान! मग त्या पानावर जे सुंदर आहे तेच लिहू द्या ना. आणि आयुष्याच्या वहीवर चालेल असे खोडरबर कोठेच मिळत नाही. हे न विसरता सुंदर क्षणांच्या नोंदी करून जगणे सर्वात सोपे जाते.
अगदी लहानपणापासून वयाच्या आठव्या वर्षापासून व्यवसायाशी संबंध आला. छोट्या-छोट्या गोष्टी विकायचो. रस्त्यावर बसून व्यवसाय करायचो. त्यामुळे असंख्य लोकांचे जवळून निरीक्षण करता आले. वेगवेगळे अनुभव आले. पुढे रंग, फनिर्चर, इलेक्ट्रिक, प्लंबिंग अशा विविध गोष्टींची कंत्राटदारी करताना आणि मग बिल्डर झाल्यावरही समाजातल्या भल्या-बुऱ्या लोकांशी संबंध आला. या वाटचालीत अनेक कटू आठवणी, अपमान झोळीत पडले. पण कायम चांगल्या गोष्टी, सुंदर अनुभवच लक्षात राहिले आणि प्रवास सुरूच राहिला.
खरे सांगतो... मला तल्लख स्मरणशक्ती नाही म्हणून मी कायम देवाचे आभार मानत असतो. आणि त्यातही मला देवाने झुकते माप दिले आहे. तो वाईटाची स्मरणशक्ती घालवतो आणि आनंदाची ठेवतो. त्यामुळेच आयुष्याचा ताळेबंद मांडल्यावर वाईटापेक्षा चांगल्याची शिल्लक फार मोठी राहते.
' जसं पेराल तसंच उगवतं.' हा साधा नियम आहे. आंब्याची कोय पेरलीत तर आंब्याचे झाड येते, निवडुंग पेरलात तर निवडुंगच येतो. आयुष्यातही असेच असते. म्हणून आनंदाचे बीज पेरावे म्हणजे आनंदाचा वटवृक्ष तयार होतो. त्याच्या सावलीत समाधानाचा मिळणारा गारवा हा आध्यात्मिक अनुभवाइतकाच शांत, निरामय ठरतो.
- डी. एस. कुलकर्णी
Thursday, May 15, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment