Thursday, May 15, 2008

प्रार्थना

डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत. गेली ५० वषेर् ते अध्यात्मावरही विविध अंगांनी लेखन करत आहेत.

........

मला माझ्या एका विद्यार्थ्याने, मी देवळात जातो का, असे विचारले. मी 'हो' असे म्हणालो. देवळात का जाता, असे विचारल्यावर, मी प्रार्थना करण्यासाठी जातो, असे त्याला म्हणालो. 'या वयात देवळातल्या देवासमोर प्रार्थना करून अजून तुम्हाला आता काय मागायचे आहे?' असे त्याने कुतूहल वाटून विचारले. तेव्हा मी त्याला म्हणालो, 'देवाजवळ काही मागून मिळत असते असे नाही. मला सद्बुद्धी दे आणि मला माझ्या विद्यार्थ्यांची अजूनही सेवा करता येऊ दे', अशी प्रार्थना मी करतो. हा संवाद मला आठवण्याचे कारण हेच की, प्रार्थना नेमकी कशासाठी करावयाची, याचा आपण विचार करतो की नाही, याची मला शंका आहे.

जगभर सगळेच लोक प्रार्थना करतात. सर्व धर्मांमध्ये निरनिराळ्या नावाने प्रार्थना कराव्यात, असे सांगितले आहे. मला देवळात जाण्यास वेळ मिळत नसल्याने जी काही छोटी प्रार्थना मी करतो ती घरीच करतो. अतिशय कामात व्यग्र असलेली माणसे प्रवासातही ती करतात. प्रार्थना करणाऱ्या या सर्वांबद्दल मला कुतूहल आणि आदर वाटतो. परंतु प्रार्थना कशासाठी केली जाते, याचा विचार केल्यावर मात्र अनेक जण एक कर्मकांड म्हणून प्रार्थना करतात, हे कळून आल्यावर विषाद वाटतो. मनापासून केलेली प्रार्थना ही पवित्र असते आणि आपले मन शुद्ध आणि स्वच्छ करू शकते. पण बहुसंख्य लोक प्रार्थना भीतीपोटी करतात किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी करतात. प्रत्येकाच्या वाट्याला अनेक दु:खे येत असतात. मनात काळज्या असतात. यातून निर्माण होणारी भीती नाहीशी व्हावी म्हणून प्रार्थनेच्या माध्यमातून असे लोक देवाचा धावा करतात. त्यांना मी दोष देत नाही. हा मानवी स्वभाव आहे. पण काही लोक अतिमहत्त्वाकांक्षी असतात. आपली कुवता आणि गुणवत्ता यापेक्षा त्यांना अधिक काही तरी मिळावे, अशा अपेक्षा असतात. त्यामुळे हतबल होऊन देवाची प्रार्थना केल्यावाचून गत्यंतरच नसते. याचनेसाठी प्रार्थना करणाऱ्यांना मी दोष देत नाही. या सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वरा-जवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.

आपल्याला गरज भासते म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा ते आपल्यातल्या दुबळेपणाचे लक्षण असते. जे आपल्यापाशी नाही, ते मिळण्याकरता केलेली प्रार्थना आपली अकार्यक्षमताच सिद्ध करते. इच्छा, आकांक्षा आणि वासना सोडून प्रार्थना करण्यासाठी फार मोठे मनोबल असावे लागते. प्रत्येक धर्मग्रंथात प्रार्थनेचे महत्त्व विशद केलेले आहे. पण त्याचबरोबर परमेश्वराने आपल्या अंत:करणात निवास करावा आणि आपल्याला सद्वर्तनासाठी मार्गदर्शन करावे यासाठी ती प्रार्थना असते, असेही धर्मगुरूंनी म्हटले आहे.

मन शांत, प्रसन्न आणि उल्हसित करण्याचे सार्मथ्य प्रार्थनेत असते. त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो. काळजातला अंध:कार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात. मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे आपण निराकार, निर्गुण अशा परमेश्वराच्या सन्निध गेल्याचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. सामान्य माणूस जगण्याची धडपड करताना किती तरी वेळा आर्त आणि बुभुक्षित असतो. त्याला अर्थाथीर् व्हावे लागते. पण पैसा हाच परमेश्वर नाही, याचा त्याला जेव्हा प्रत्यय येऊ लागतो, तेव्हा तो साधक होतो. गुरूचे मार्गदर्शन घेऊन आणि गुरूच्या अनुग्रहाचा त्याच्यावर वर्षाव झाल्यावर तो जी साधना आणि तपश्चर्या करतो, त्यातून निर्माण झालेली प्रार्थना अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन:शांती निर्माण करते. अशा वेळी सभोवतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो. परमेश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. मनात आणि शरीरातही नवी चेतना निर्माण झाल्याचा अनुभव येतो. आपले स्वत:चे अस्तित्व आपण विसरतो. राग, द्वेष, असूया, अहंकार, वासना गळून पडतात. आपण स्वत:च्या उद्धारासाठी प्रार्थना करतो. जगातल्या अनेक विभूतींनी संपूर्ण मानवतेसाठी प्रार्थना केल्या आहेत आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे भरकटलेल्या समाजात स्थैर्य आणि शांतता आली आहे. गौतम बुद्धाने मानवतेसाठी केलेल्या प्रार्थनेमुळे नरसंहार थांबला. अराजक नाहीसे झाले. स्वामी विवेकानंदांनी केलेल्या प्रार्थनेच्या संदेशात या पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एकच आहे आणि ती एक राहावी, ही हाक होती. महात्मा गांधींच्या प्रार्थनेत अहिंसेचा मूलमंत्र होता. अवनीतलावर विसाव्या शतकात महात्मा गांधी नावाचा मानवतेचा एक पुजारी संपूर्ण जगात प्रेम, समता, शांतता आणि बंधुता नांदावी यासाठी वणवण करीत होता, हे आणखी पाचशे वर्षांनी कदाचित कोणालाही खरे वाटणार नाही, असे आईन्स्टाईनने उद्गार काढले आहेत. दीनदुबळ्यांचे आणि व्याधींनी त्रस्त झालेल्यांचे अश्रू पुसणाऱ्या मदर तेरेसांची प्रार्थना किती तरी उदात्त होती. आपल्या प्रार्थनेतून मानवसमूहाला प्रकाश देणारे योगी अरविंद अजूनही आम्हा सर्वांना दीपस्तंभासारखे वाटतात. मात्र प्रार्थनेतील शब्द, स्वर, स्वरूप कसेही असले, तरी त्यामध्ये एकाग्रता हवी. तरच ती खरी प्रार्थना म्हणता येईल.

- डॉ. प्र. चिं. शेजवलकर

No comments: